Tuesday, February 13, 2007

दीपावली २००६ !

मला माहितीये... आणखी थोडा थांबलो तर २००७ सालच्या दिवाळीचा अनुभव म्हणून हा लेख सहज खपून जाईल. आळशीपणा हा असा नडतो. पण Mood Indigo यायला वेळ हा लागतोच ;) तर New Zealand मधली माझी ही पहिलीच दिवाळी (आणि ती शेवटचीच ठरो- उरलेल्या दिवाळ्या सगळ्या भारतात !) गणशोत्सवाप्रमाणेच जोरदार planning with minimal resources !


दीपावळीबद्दलच्या माझ्या कल्पना एकदमच पोरकट आहेत. लक्ष्मीपूजन, वसुबारस, पाडवा यापेक्षा मला आवडते ते नरकचर्तुदशीचे अभ्यंगस्नान! भल्या पहाटे उठून सुगंधित उटण्याने आंघोळ करताना आणि आईकडून ओवाळून घेताना किती मस्त वाटते म्हणून सांगू? आणि आंघोळ सुरू असताना बाहेर फुटत असलेले फटाके? आहाहा !! तसेच आवडते ते आकाशकंदील करायला. स्वतःच्या हाताने केलेला आकाशकंदील जेवहा गॅलरीत विराजमान होतो आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो तेंव्हा होणारा आनंद " रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा" असा असतो. आणखी आवडते ते जागोजागी पणत्या लावायला. गुडूप अंधारात जेव्हा चिमणीशी पणती सभोवती पिवळा प्रकाश देत दिमाखाने तेवू लागते तेव्हा का कोण जाणे पण स्वतःमधला Eternal Optimist जागा होतो. पाडव्याच्या दिवशी ढिगभर झेंडूची फुले अऩ आंब्याची पाने आणून हार करायचो आणि घरातल्या प्रत्येक दारात ते लावायचो- अगदी बाथरूमचे दार पण अपवाद म्हणून नाही ठेवायचो, फराळाचे खायचो- एकदम fresh आई ते बनवत असतानाच.

लहानपणी दिवाळीची सुट्टी लागली की आम्ही बच्चेकंपनी घरगुती Greeting Cards बनवायचो- घरभर काळजीपुर्वक सुकवलेली फुले, पिंपळपानांच्या जाळ्या,जिलेटिन पेपर्स,रंगात भिजवलेले दोरे यांचा पसारा झालेला असायचा. आणखी एक लहानपणीचा छंद जो आजतागायत टिकून आहे तो म्हणजे किल्ला बनवण्याचा. माझ्या आज्जीला भुईकोट किल्ला बनवायची भारी हौस ! दर वर्षी दिवाळीची सुट्टी लागली की आम्ही किल्ला बनवायला लागायचो-किल्ल्यात गहू पेरून मस्त शेती करायचो. मग शिवाजी महाराज आणि मावळ्यांची प्रतिष्ठापना व्हायची.


या सगळ्या गोष्टींना New Zealand मध्ये येऊन मुकणार ही खंत मनाशी बाळगतच दिवाळीची वाट पाहत होतो. आधी सहा महिने सांगून सुरू झालेला प्रोजेक्ट मारोतीच्या शेपटासारखा "वाढता वाढता वाढे। भेदिले शुन्यमंडळा ॥" होऊ लागला होता ; पण वाईटात चांगली गोष्ट अशी की As an Electronics Engineer या प्रोजेक्टच्या निमित्ताने माझा Semiconductor Vendors लोकांशी Contact येतो. आता हे लोक म्हणजे आमच्या Industry मधले M.R. (Medical Representative) असतात. आमच्याच कंपनीचे Component Samples ट्राय करा असा सतत लकडा लावलेला असतो. म्हटले चला त्यांचे samples literally "Try" करूयात. आपले Engineering skills वापरून Super Bright LEDs (Light Emitting Diodes) पासून बनवलेला आधुनिक आकाशकंदील किती मस्त वाटेल नाही? General Purpose PCB वर हे LEDs mount करून त्यांचे Blinking असे program करावे की मस्त patterns तयार होतील. झाले- काम सुरू झाले. Samples मिळवण्यात आणि ते solder करण्यात फारसे कष्ट पडले नाहित.स्वस्तिकाच्या shape चा आकाशकंदील Beta Testing साठी तयार झाला-आणि इथेच माशी शिंकली. हे स्वस्तिक बाहेरच्या खिडकीवर टांगले होते आणि अचानक दोनपैकी एक दोरा तुटला आणि स्वस्तिक कलंडले. रस्त्याने जाणाऱ्या एका हितचिंतकाने सांगितले की त्याला "नाझी" पक्षाची आठवण झाली हे तिरके स्वस्तिक पाहून ! धन्य हो ! हिटलर ला पण स्वस्तिकच कसे हो सुचले बोधचिन्ह म्हणून? असो.. मुद्द्यावरून गाडी गुद्द्यावर येण्याआधी पुढे सटकतो. झाले माझ्यातला पांढरपेशीय मध्यमवर्गी जागृत झाला. नसत्या कुरापती कशाला? आपल्या दिवाळीखातर केलेल्या उचापतींमुळे न जाणो New Zealand मध्ये ’रास्ता रोको’ आणि ’दगडफेक’ वगैरे प्रकार झाले तर.... ? तर अशा रितीने त्या "Electronics आकाशकंदीलाचा” बेत बारगळला.



याचवेळी आमचे घरमालक देवासारखे मदतीला धावून आले. त्यांच्याकडे Christmas साठीच्या लाईटच्या माळा आणि Christmas Tree वर लावण्यासाठीचा चांदणीच्या आकाराचा दिवा होता. चला- यालाच आपण दिवाळीचा आकाशकंदील मानूयात असा सरळमार्गी विचार केला.


भारतातून माझी बहीण भारतातून मातीच्या पणत्या पाठवणार होती- रोज उठलो की त्या पार्सल ची वाट पाहत होतो. ( मात्र कुरियरवाल्यांच्या पराक्रमामुळे ते पार्सल सगळ्या जगाची सैर करुन माझ्यापर्यंत पोहोचले- दीपावळी उलटल्यानंतर एका आठवड्याने. Never Mind ! त्या पार्सल मध्ये पणत्याच नव्हे तर झेंडुच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांव्हे तोरण, एक छानसे hand-made भेटकार्ड,उंबऱ्यातल्या आणि देवघरातल्या रांगोळीचे Stickers पण होते. मग? Shock of Surprise !! यंदा माझी दिवाळी दोनदा साजरी झाली :))


का कोण जाणे पण नरकचतुर्दशीच्या पहाटे पहाटे होणाऱ्या अभ्यंगस्नानाचे मला फार अप्रुप आहे. यंदा परदेशी असलो आणि ओवाळायला आई नसली तरी निदान ’सुगंधित उटणे’ लावून केलेले अभ्यंगस्नान तरी miss करायचे नाही अशी खुणगाठ मनाशी बांधली होती. मग मस्तपैकी गजर लावला पहाटेचा. पहाटे गजर केकाटू लागला. ’गुरू’ एव्हाना release झाला नसला तरी "जागे है देर तक हमें कुछ देर सोने दो। थोडी सी रात और है सुबह तो होने दो॥ " अशी अवस्था होती. As usual गजराला आधी दोन-तीनदा Snooze करून मग कायमचेच गप्प करून उठेपर्यंत चांगलेच उजाडले होते. आळशी लोक सबबी पुढे करताना नको तितके तल्लख असतात असे म्हणतात. New Zealand मध्ये दुपारचे १२ वाजले म्हणून काय झाले.. भारतात तर पहाट असेल ना...आपण भारतीय वेळेनुसार अभ्यंगस्नान करतोयच की.


त्यानंतर पार पडला ’घरगुती उटणे’ बनवायचा विधी.

घटक: बारीक कुटलेला कापूर (नशीब थोर- निदान कापूर तरी मिळाला), उदबत्तिचा चुरा, डाळीचे पीठ, दुध असे हे उटणे आणि बाथरूमच्या आरशात पाहून स्वःतलाच ओवाळण्यासाठी मेणाच्या पणत्या (पुन्हा एकदा- Thanks to Christmas !). अशा राजस, मंगलमय वातावरणात अभ्यंगस्नान पार पडले. आईची आठवण प्रकर्षाने झाली. नंतर मग देवपुजा.


आज देव Lucky होते. उदबत्ती, कापूर, (मेणाचा का असेनात) दिवा, हळद, (गेल्या खेपेप्रमाणे हळदीत Surf घालून केलेले) कुंकू, (फिजीतल्या नारळाचे) गोड खोबरे- काय तो थाट वर्णावा !


अशातच Flatmate मित्राने गुलाबजाम बनवायचे ठरवले. recipe download करण्यापासून सामान-सुमान arrange करेपर्यंत दुपार टळून गेली. मग मैद्याच्या गोट्या करणॆ, साखरेचा पाक बनवणे, तळणे असे करत करत बनले एकदाचे ! मात्र काय झाले कळण्यास मार्ग नाही पण गुलाबजाम चावता चावता दातांचा मात्र ’चक्काजाम’ झाला. त्याचा तो पहिला प्रयोग सपशेल फसला तरी kiwi style ने No Worries, Mate ! म्हणत आम्ही गुलाबजामना खपवण्यासाठी marketing सुरू केले.


त्या दिवशी रात्री घराचा सज्जा लाईटच्या माळा आणि चांदणीचा आकाशकंदील यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या कुतूहलमय नजरा पाहुन कृतार्थ झालो.एक-दोन उत्सुक आत येऊन आणखी विचारपूस करून गेले. आपल्या दीवाळसणाबद्दल भरभरून बोलायचा chance मी कसा सोडेन?



पाडव्याच्या दिवशी व्यापारी लोक "वहीपूजन" करतात. या "नव्या युगातील नव्या दमाच्या शुर शिपायाने" पण पाडव्याला आपले "Compaq वही (Notebook) पूजन" केले.


दिवाळीदरम्यान फटाक्यांना मुकलो तरी ती उणीव लवकरच भरून निघाली- Guy Fawkes Day च्या निमित्ताने. या दिवसाची खरी गंमतच आहे. कुण्या Guy Fawkes नामक माणसाने इंग्लंडची संसद उडवून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून दर वर्षी ५ नोव्हेंबरला इथे आतषबाजी होते आणि आपल्याकडील रावणदहनाप्रमाणे Guy Fawkes चे प्रतिमा दहन होते. वर्षातून फक्त याच एका दिवशी फटाके उडवण्यास परवानगी असते.


दिवाळी आली तशी गेली...पण Braincells च्या Storage मध्ये ती कायमचीच राहील - तिच्या वेगळेपणासाठी !

6 comments:

Unknown said...

kaay re ekdum pothi puraan lihale aahe....pan khup lavkar lihale aahe..:)
mast aahe tujhe experiences NZ che...
vachun vatata aahe amhi tari tithe hoyalya pahijhe hote...

Kamini Phadnis Kembhavi said...

मस्त् लिहीतोस :)
तुझी गणपतीपुजा पण वाचली होती मला वाटत ई सकाळमधे

लगे रहो :)

Mints! said...

are te photo disat nahit ki! picasa varun upload kar - works like charm.

Mast lihiles re:)

Tulip said...

छानच लिहितोस की! आवडली सगळी पोस्ट्स. वाचलाच नव्हता गेला हा ब्लॉग कधी. सण साजरे करायचा उत्साह ग्रेट आहे तुझा. ब्लॉग लिहिताना पण तसाच उत्साह कायम ठेव. keep posting!. .

सारंग पतकी said...

झकास experience रे! इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतोय याचाही संमिश्र आनंद दिसतोय तुझ्या लिखणातील उत्साहामागे.

असेच आणखीही अनुभव वाचायला मजा येईल. गुडी पाडव्याच्या शुभेच्छा! (त्याबद्दलही वाचायला आवडेल :))


पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

Anonymous said...

आता मराठीत ल्हिवना सोप्पा आहे...ही साईट पहा www.quillpad.in/marathi हेच्यात तुम्ही मराठीत ल्हिव शकतया...हेच्यात ना तुम्ही ज़ार मराठी लिपीत ल्हिवल्या तर ते त्याला मरही लिपीत बदलते...वापरुन पहा तुम्ही..फार सोप्पा आहे...