Saturday, November 25, 2006

New Zealand ची गणेश चतुर्थी

New Zealand मधली यंदाची पहिलीच गणेश चतुर्थी कायमची लक्षात राहील- तिच्या modern पणामुळे.
गणपती तसा माझा सर्वात आवडता देव.. त्यामुळे बाकी काही नाही करता आले, तरी निदान गणोबांची प्रतिष्ठापणा करावी असे मनात होते..
सुरुवात झाली तारीख लक्षात ठेवण्यापासून. Reminders सेट केले गेले, ई-सकाळ bookmark केले गेले.. Google Alerts ची पण मदत घेतली गेली.
तशी माझ्याकडे एक मुर्ती आहे श्री गणेशाची.. मी दहावीत बोर्डात आल्यावर भेट म्हणून मिळालेली. जिथे-जिथे मी गेलोय तिथे तिथे ती मुर्ती मझ्या सोबत राहत आलेली आहे. मग ठरवले की गणोबांना निदान दहा दिवस तरी कुठलेसे मानाचे स्थान द्यावे. पण विसर्जन... ? कदापि नाहि !!

आपल्याकडे असलेले resources अनि त्यात काय काय भागवता येईल याचा आढावा घेतला गेला-नशीब इथे अगरबत्ती मिळते. ती आणून ठेवली आधीपासुनच..... आणि होता होता गणेश चतुर्थी चा तो शनीवार उजाडला! Already set केलेल्या कित्येक
alarms आणि reminders नी माझी झोप उडवली.
पट्कन आन्हिक उरकले आणि मस्तपैकी खास भारतातून येताना आठवणीने आणलेला नवा कोरा कुर्ता-पायजमा घालून तयार व्हायला निघालो इतक्यात लक्षात आले की पायजमा नको त्या ठिकाणी उसवला आहे...आता गणेश चतुर्थी च्या पवित्र दिवशी मुखातून अपशब्द काढायची पण पंचाईत, हल्ली पायजमे पण चायना मध्ये outsource करत असावेत अशी शंका मनाला चाटून गेली.
त्या रद्दड दोर्याचा उद्धार करत पहिले कम केले... ते सुइ-दोरा आणन्याचे.
'प्रथमाग्रासे मक्षिकापातः' झाल्याने जरासा हिरमुसला झालो होतो..
पण मनात ठाम निर्धार होता... आधी लगीन कोंढाण्याचे.... (मग आपले... !)
जमवा-जमवी ला सुरुवात केली. आमच्या घरी दर वर्षी साग्र-संगीत पुजा होते.. त्यामुळे basics तसे clear होते. लाल फुल शोधायला बाहेर पडलो. अंगात कुर्ता-पायजमा आणि कपाळावर टिक्का... त्यामुळे मी "The Guru" सिनेमा मधल्या जिमी मिस्त्री सारखा दिसत होतो.(आमच्यातले साम्य इथेच संपते बरं का.. जिमी मिस्त्री पुढे जी काही धमाल करतो... ती मी फक्त स्वप्नातच करु शकेन!)
येणारे जाणारे किवी लोक आश्चर्य-मिश्रित कौतुकाने (कौतुकाने हा शब्द मी माझ्या समाधानासाठी टाकलाय.. त्यांच्या नजरेत नेमके काय भाव होते.. तेच जाणोत !) पाहत होते. आता इथल्या लोकांना एक गोष्टीसाथी धन्यवाद द्यायला हवेत.. जिथे पहावे तिथे बैठ्या घरांच्या लाकडी कुंपणावर मस्त पैकी फुलांचे वेल चढवलेले असतात. त्यामुळे फुले तोडायला काही प्रयास पडले नाहीत. आणि गम्मत म्हणजे फुले तोडताना काही घर-मालकांनी खिडकीतून पाहिले तरी अपल्याकडच्या प्रमाणे कुलाचा उद्धार नाही केला.. (फुले तोडताना मला अपल्याकडच्या आजी-आजोबांची आठवण येत होती. बर्याचदा प्रभात-फेरी चा मुख्य उद्देश असतो बाकि लोक उठायच्या आत त्यांच्या कुंपणा वरची फुले तोडणे.. आणि मग घरी येऊन मोठया धर्मिकतेने पुजा-अर्चा करणे...) कदाचित तो माझ्या "The Guru" अवताराचा परिणाम असावा.
चला बिनवासाची का असेनात -फुले जमली, अगरबत्ती तर आधीच आणलेली होती. हळद होती.. पण कुंकू? कुंकू तर नाही मिळाले कुठे.
मग एक idea सुचली. अपल्याकडचे बुवा जे चमत्कार करतात ना- लिंबामध्ये हळद टाकली तर जो भक्त खरा असेल त्याच्या लिंबातली हळद लाल होते.. त्यामागचे principle सोपे होते.
मग कुंकू तयार करण्याचा विधी केला गेला. हळदीमध्ये surf excel घातले आणि झाले कुंकू तयार !!
उदबत्ती पेटवणर कशी हा एक यक्ष-प्रश्न होता. कारण सुदैवाने (खरे पाहता इथे दुर्दैवाने म्हणावे लागेल) आमच्यापैकी कुणी विडी ओढत नाही त्यामुळे काडी असण्याचा सवालच नाही. आणि घरी hot plate आहे ती काचेने झाकलेली. मग "बिरबल की खिचडी" प्रयोग सुरु केला. Hot plate च्या काचेवर बराच वेळ उदबत्ती धरुन ठेवली आणि फुंकर मारत राहिलो, शेवटी पेटली एकदाची!
नैवेद्य म्हणून काही तरी गोड धोड असावे, पण मी स्वतः काही संजीव कपूर नाही आणि आमच्या कडे असा महान बल्लवाचार्य पण नाही. मग त्यावर पण एक धांसू उपाय-नैवेद्य म्हणून NZ special pineapple toffies and Cookies ठेवल्या.
पुजेची सगळी तयारी झाली. गेले काही दिवस खास गणरायासाठी download करुन ठेवलेली गाणी, स्तवन आणि संगीत वाजू लागले (kudos to cooltoad.com :). मी मला येतील तितके मंत्र इत्यादी म्हटले (लाज वाटत असली तरी सांगायला हरकत नाही. अथर्वशीर्ष आणि "प्रणम्य शिरसां देवं" सोडून काही पाठ नाही बाबा आपल्याला.. लहानपणी रामरक्षा, "भिमरुपी महारुद्रा" आणि गीतेचा १२वा अध्याय पाठ होता.. पण आता? सगळे काहि विसरलो)
शेवटी आरतीची पाळी आली तेव्हा लक्षात आले की निरंजन इत्यादि light source नाही आपल्याकडे... पण "light source" वरुन आठवले, की आपल्याकडे EverReady Emergency Torch आहे. अशा emergency साठी Ever Ready !
मग काय दोन्ही हातात EverReady Torch धरुन "सुख-कर्ता दुःख-हर्ता" सुरु झाले ...............
इकडे आरती होत नाही तितक्यात फायर-अलार्म वाजायला लागला..
उदबत्तीचा जरासा धूर पण सहन झाला नाही त्याला! (तशी आम्हाला आमच्या फायर-अलार्म ची सवय झालीय हल्ली, दररोज स्वैपाक करताना एकदा तरी तो वाजतोच.. तो वाजला नाही तर चुकल्यासारखे वाटते) मग नेहमीप्रमाणे त्याच्यासमोर टोवेल फडकावून त्याला शांत केले. एक काम मात्र झाले, अलार्म वाजल्याने माझे बाकी flat-mates जागे झाले :))
आता रोज आरती आणि काही तरी cadburry वगैरेंचा प्रसाद मिळत राहतो गणरायाला.
मला माहित नाही, जे काही केले ते शास्त्रात बसते किंवा नाही, शास्त्र काहीही सांगेना, गणोबांवर माझी श्रद्धा आहे आणि ते पण हा आगळा-वेगळा सोहोळा गोड मानून घेतील यात मला काही शंका नाही. शेवटी New Zealand ची रसाळ आणि मधुर sweets खाऊन कोण नाही पाघळणार? :)
मोरया !!!!!
-----
अमेय गंभीर
न्युझीलंड

Monday, November 13, 2006

नमस्कार मंडळी !

सर्व समवयस्क मंडळींना अमेय गंभीर नामक नवोदीत Blogger कडून सप्रेम नमस्कार! (ज्येष्ठांना साष्टांग दंडवत, आणि लहानग्यांना गालगुच्चा ! :))

नमनाला घडाभर तेल सांडण्याऐवजी थेट सुरुवात करतो.... पण कशाला?
हा प्रश्न तुमच्याइतकाच माझ्यासाठी पण यक्ष बनून राहीला आहे.

कित्येक दिवस blog कशाशी खातात हे माहित नव्हते; बरं माहित झाले तरी काय लिहू आणि इतरेजन का म्हणून वाचतील ही सार्थ भीती होती. अशा वेळी (आणि फक्त अशाच वेळी बरं का.. ! ) गीता आठवली. आपली भगवतगीता हो.....
"कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन ।"
सुरुवात झाली ती emails पासून. अभिप्राय येत गेले की बरा लिहितोस तू... लिहित जा.
आता मित्रच ते, बिचारे मी बेकार लिहितो असे कसे बर सांगतील? शिवाय शेजारच्या घरी निंदक राहत नाहीत; तिथे तर कुलकर्णी वसतात. त्यांमुळे अस्सल critics कधी भेटलेच नाहीत हो.
आता तुमच्या रुपाने भेटले तर सहीच !

तसा हा blog प्रकार मस्त आहे. पुर्वी हौशी लेखकांना टपालावर विसंबून राहावे लागायचे... शिवाय बर्याचदा "साभार परत" चे संपादकांकडून प्रेमपत्र यायचे...
आता काय उचलले हात लावले keyboard वर.. वाचकांच्या प्रतिक्रिया थेट तुमच्या दारी- I mean Screen वर हो. हे म्हणजे आमच्याकडच्या शेतकर्-याने आपले डाळींब थेट गिर्हाईकाच्या (sorry.. still not familiar with marathi unicode..) दारात नेऊन विकल्यासारखे झाले. संपादक नामक खडूस प्राण्यापासुन मुक्ती !

आणखी एक प्रश्न पडला असेल तुम्हाला- "प्रमेय" काय प्रकार आहे? blog ला प्रमेय हे नाव कशासाठी?
प्रमेय चा इंग्रजीत अर्थ होतो Theorem. "पायथागोरस चे प्रमेय" लक्षात असेल बर्याच जणांना.. आणि त्याची ती "अप्रत्यक्ष सिद्धता" (Indirect Proof) पण ! (काही म्हणा आपल्या मराठी माध्यमाच्या कृपेने बरेच क्लिष्ट शब्द पचनी पाडुन घ्यावे लागले आहेत... :)))


मी जे काही लिहितोय- ते माझे- माझ्या अनुभवांवर बेतलेले आहे. एका अर्थाने माझा हा blog हेच माझे जीवनरुपी "प्रमेय" आहे. एक असे प्रमेय ज्याच्या सगळ्याच सिद्धता "अप्रत्यक्ष" आहेत. आणि कदाचित मी सोडून इतर कुणीही सिद्ध करु शकणार नाही..
पण माझी ही अप्रत्यक्ष सिद्धता बेतलेली आहे अनेक गृहीतकांवर (assumptions) आणि ही गृहीतके अवलंबून आहेत तुमच्यावर ! हो हो.... स्तुतिपाठक असेनात का निंदक ... तुमचे अभिप्राय मला माझी गृहीतके सुधारायला भाग पाडतील.

व्युत्प्त्तीकार (etymologist )प्रमेय शब्दाची व्याख्या (definition) कशी का करेनात..
मी मला आवडेल असा अर्थ घेतोय....
कुठल्याही शब्दाला "प्र" हा उपसर्ग लागला की त्याचे वजन वाढते. उदा. प्र-आचार्य, प्र-मुख....
तसेच प्र-अमेय.
माझे वजन (फक्त शाब्दिकच!) वाढवण्याचा हा आणखी एक यत्न !
(Google Spiders कुठे झोपा काढता आहात? या लवकर माझ्या दर्शनाला !)
खरं सांगू? मी फक्त "अमेय" शी यमक जुळवतोय. आता नाव ठेवलेच आहे तर त्याला साजेसे justification पण शोधुन काढता येईल. जसे मी शोधले आहे. तसे प्रमेय हे माझ्या भावाचे- यतीन चे unofficial नाव होते.. लहान असताना.

just गंमत म्हणून मी केलेला नामकरण खटाटोप सांगतोय..
मला सुचलेली इतर काही नावे.. (म्हणाल तर प्रत्येकाचे justification पण तयार करता येईल.. त्यात काय इतके... ;))

परिमेय
अपरिमेय
चौफेर
खटाटोप
अस्ताव्यस्त
टवाळ
................................

बस... माझा तेलाचा घडा रिता झाला.. फ़िलहाल तरी.
Stay Tuned !!
Coming soon !

Ameya Gambhir
अमेय गंभीर